महाविकास आघाडीची तिरकी चाल; पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांना उतरवणार?

पुणे : पुण्यातील भाजपचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

सध्यातरी भाजपमध्ये पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या गळ्यात निवडणुकीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीने जर हे पाऊल उचलले तर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला  भाजपकडून गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे (Swarda Bapat, former mayor Muralidhar Mohol and former MP Sanjay Kakade)  या तीन नेत्यांपैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. संजय काकडे आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या असल्या तरीही त्यांना सहानभूतीचा फायदा होऊ शकतो असं दिसत असल्याने त्यांचा देखील दावा तेवढाच ताकतीचा आहे. त्यामुळे भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.