तुमच्या मुलाला दिवसरात्र मोबाईल पाहायची सवय लागलीय? फोन स्क्रिनमुळे मुलांना होतोय ‘हा’ आजार

Myopia Symptoms: डोळे हा शरीराचा संवेदनशील भाग आहे. त्यात थोडीशीही अडचण आली तर लगेच सावध होण्याची गरज आहे. आजच्या जीवनशैलीत मोबाईलचा वापर हा एक मोठा भाग बनला आहे. लॅपटॉप, टीव्ही आणि इतर डिजिटल स्क्रीनचा वापर वाढत चालला आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या हातातही मोबाईल दिसत आहेत. मुले एकतर मोबाईलवर गेम खेळतात किंवा त्यांच्या आवडीची कार्टून पाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लहान मुलांचा हा छंद त्यांच्या डोळ्यांनाही आजारी बनवत आहे. लहान मुले आता डोळ्यांच्या आजाराला बळी पडत आहेत.

मायोपिया रोग मुलांमध्ये दिसून येतो
लहान मुले मोबाईल सारख्या छोट्या स्क्रीनचा अगदी बारकाईने वापर करत आहेत. अशा स्थितीत मायोपिया रोग त्यांना आपल्या कवेत घेत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मायोपिया हा लहान मुलांमध्ये होणारा दृष्टी दोष आहे. या आजारामध्ये मुलांच्या डोळ्यातील बुबुळाचा आकार वाढल्यामुळे डोळयातील रेटिनाऐवजी थोडी पुढे प्रतिमा तयार होते. त्यांना दूरच्या गोष्टी पाहण्यात अडचणी येतात. लहान डिजिटल स्क्रीन डोळ्यांसाठी आणि चष्मा घालणाऱ्या मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. त्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे.

मायोपियाची लक्षणे
वारंवार डोळे मिचकावणे, दूरच्या गोष्टी स्पष्टपणे न दिसणे, दिसण्यात अडचण, डोकेदुखी, पापण्या मिचकावणे, डोळ्यातून पाणी येणे, वर्गातील काळ्या पाट्या किंवा पांढऱ्या बोर्डवर लिहिलेले नीट न दिसणे, पुस्तकांमधील अक्षरे स्पष्टपणे दिसत नाहीत ही मायोपियाची लक्षणे आहेत.

पालकांनी अशी काळजी घ्यावी
मुलं शिकत असलेल्या ठिकाणी योग्य प्रकाशयोजना असावी. मुलांना कमीत कमी मोबाईल वापरायला द्या, अभ्यासासाठी डिजिटल स्क्रीन द्यायची असेल तर मोबाईल ऐवजी लॅपटॉप द्या, दररोज कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला लावा, ड्रायफ्रुट्स, पौष्टिक आहार, व्हिटॅमिन ए युक्त आहार मुलांना द्या.

(टीप: या लेखात नमूद केलेल्या पद्धती, माहिती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.)