नागालँड विधानसभेत रिपब्लिकन पक्ष खाते उघडणार; रामदास आठवले यांनी व्यक्त केला विश्वास 

दिमापूर – नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे 8 उमेदवार निवडणूक रिंगणात कडवी लढत देत असून यातील किमान 3 उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास असून येथील घासपाणी विधानसभा मतदारसंघात रिपाइंचे उमेदवार झेड. कशेटो येप्थो यांचा प्रचार संपूर्ण नागालँडमध्ये चर्चेचा विषय झाला असून त्यांच्या विजयाने नागालँड विधानसभेत रिपाइं निश्चित खाते उघडणार असल्याचा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे.
नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन दिवसीय दौऱ्यावर ना.रामदास आठवले आले असता दिमापूर येथे झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. नागालँड मधील नवीन झालेला जिल्हा  त्सेमीन्यू ;  दिमापूर ; घासपाणी ; अबोई आदी ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी जाहीर सभांना संबोधित केले.पदयात्रा आणि रोड शो ही ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारार्थ केले.
नागालँड मध्ये विधानसभेच्या  एकूण 60 जागा असून भाजप 20 जागा तर एन डी पी पी 40 जागा लढत असून भाजप एन डी पी पी युतीला 52 जागांवर रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत पक्ष असल्याने निवडणुक लढणे आवश्यक असल्याने नागालँड मेघालय आणि त्रिपुरात रिपाइं चे उमेदवार निवडणूक लढत देत आहेत.नागालँड मध्ये रिपाइं चे तीन उमेदवार निवडून येणार असून निवडून येणारे रिपाइं उमेदवार भाजप एनडीपीपी युतीला समर्थन देतील अशी घोषणा आठवले यांनी केली. 

नागालँड मध्ये सर्व दलित आदिवसी सह जाती धर्मियांच्या सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी रिपब्लिकन पक्ष काम करीत असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा नागालँड च्या घराघरात पोहोचविण्यात आम्हाला यश येत असुन आंबेडकरी विचारधारा नागालँड ने आत्मसात केली असून विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद त्याचे प्रतीक आहे असे आठवले म्हणाले.