झालं गेलं गंगेला मिळालं : संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मनोमिलन

सांगली – सांगली (Sangli) लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जहरी टीका करणाऱ्या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झाले आहे. खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) या दोन नेत्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

आटपाडीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांचे खंदे समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे मित्र अनिल पाटील यांनी पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या दोन नेत्यांना एकत्र आणलं. यात दोन्ही नेत्यांनी दोघांमधील वादाला तिलांजली देत असल्याचे दाखवून दिले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत हे दोघेजण एकमेकांविरोधात उभे होते. संजयकाका पाटील भाजप कडून तर गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी लोकसभा लढवली होती. निवडणूक निवडणूक प्रचारात तर दोघांनी एकमेकांवर जहरी टीका देखील केली होती. पण हा सगळा भूतकाळ विसरुन हे दोन नेते एकत्र आल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते मात्र सुखावले आहेत. सोबतच या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने जिल्ह्यातील भाजपा नेत्यांमधील अंतर्गत वाद थांबण्यास आणि गटातटात कार्यकर्त्यांची होणारी विभागणी थांबण्यास मदत होणार आहे.