आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच गोविंदा आरक्षणाचा निर्णय, रोहित पवारांची टीका 

पुणे – दहीहंडीचा (Dahihandi) क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट) विधानसभेत केली आहे. तसंच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हीहंडीतील (Dahihandi) गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी ?

दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.