Luna-25 Mission: रशियाचे चंद्रावर पोहोचण्याचे स्वप्न भंगले, लुना-25 अंतराळयान चंद्रावर कोसळले

Russia’s Mission Luna 25 Crashed: रशियाची लुना-25 मोहीम (Luna 25 Mission) सपशेल अपयशी ठरली आहे. रशियाने चंद्रावर सोडलेले लुना-25 अंतरिक्ष यान चंद्रावर जाऊन कोसळले आहे. रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने याबद्दल ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, एक दिवस आधी लुना-25 या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाला होता.

रशियाचे स्पेस कॉर्पोरेशन रोस्कोस्मोसने सांगितले की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना-25 यान चंद्रावर आदळले. रोस्कोस्मोसने एक दिवसापूर्वी नोंदवले होते की लँडिंगपूर्वी कक्षा बदलताना एक असामान्य परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे लुना-25 कक्षा योग्यरित्या बदलू शकले नाही. सोमवारच्या नियोजित टचडाउनच्या आधी शनिवारी 11:10 GMT वाजता यानला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ही परिस्थिती उद्भवली.

स्पेस एजन्सीने सांगितले की तज्ञ सध्या अचानक आलेल्या समस्येचा सामना करण्यास असमर्थ आहेत. त्यावर ते सातत्याने काम करत आहेत. याआधी, रशियन एजन्सीने सांगितले होते की लूना 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.