जि. प. शाळा कोंढेजच्या मुलींची भन्नाट कामगिरी; लंगडी स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला

करमाळा – आज दि. 30/12/2022 रोजी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षण विभागाने शिवछत्रपती विद्यालय वीट येथे इ. १ते ५ व इ. ६ते ८ अशा दोन गटाच्या तालुकास्तरावरील खो-खो, कबड्डी , लंगडी अशा सांघिक व १००मीटर, २००मीटर व बुद्धिबळ अशा वैयक्तिक स्पर्धा घेतल्या. या स्पर्धामध्ये करमाळा तालुक्यातील एकुण ३२ संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत जि. प. शाळा कोंढेज (Kondhej) येथील इ. ६ते ७वी मधील मुली या संघाने लंगडी या सांघिक स्पर्धेत तालुकास्तरावर कर्णधार जयंती इंगोले हिच्या नेतृत्वात प्रथम क्रमांक पटकावला.

हा संघ जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तसेच इ. ६ते ७वी मधील मुले हा संघ कर्णधार आदित्य लगस याच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावर उपविजेता आहे. या संघाना संजय भानवसे सर , गणेश देवकर सर व शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब व विस्तार अधिकारी नलवडे साहेब, केंद्र प्रमुख भंडारे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक  अशोक गवेकर सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश लगस,व सर्व सदस्य, गावचे सरपंच सर्व सदस्य या सर्वांनी शाळेला ट्राफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कोंढेज गावातील शाळेतील शिक्षणाचा दर्जा देखील उत्तम असून अनेक नामवंत विद्यार्थी, अधिकारी, नेते आणि कलाकार या शाळेने घडवले आहेत. आता क्रीडा क्षेत्रात देखील ही शाळा चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे.