कुठेही असलो तरी छत्रपती फुले, शाहू आंबेडकरांची भूमिका कायम राहील- मंत्री छगन भुजबळ

नाशिक:- कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. मात्र माध्यमांनी केवळ एक बाजू सांगितली तशी दुसरी बाजू पण सांगायला हवी असे सांगत कुठेही असलो तरी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकरांची भूमिका कायम राहील अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याने आज मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी चर्चा करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मविप्र समाज दिनाच्या कालच्या कार्यक्रमात ज्यांनी शिक्षणासाठी काम केले,त्यांचे फोटो होते. आपल्याला शिक्षणाची कवाडे फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज,डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी कोट्यवधी लोकांना शिक्षित केले. हे आमचे देव आहे, त्यांची पूजा केली पाहिजे. मी हे आजच बोलतोय असा काही भाग नाही. तर वेळोवेळी त्याबद्दल मी बोललो आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असं काही नाही.. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. मी जे काही बोललो त्यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, भिडे यांनी वाडा दिल्यामुळे पुण्यात पहिली शाळा सुरू झाली. चिपळूणकर ,आगरकर आदी ब्राम्हण समाजाच्या विविध समाजसुधारकांनी फुले दांपत्याला साथ दिली.

ते म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे. आमच्या घरात सगळे देव आहे.सर्व देव आम्हाला चालतात. कुणाच्याही भावना आपण दुखावलेल्या नाही. ज्या महापुरुषानी आपल्याला शिक्षण दिलं त्यांचं पूजन करायला हवं अशी भूमिका आपण मांडली आणि ती कायम राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आजही आपल्या शैक्षणिक संस्थेत ज्या महापुरुषानी विविध विषयात योगदान दिले त्या सर्वांचे पुतळे बसविण्यात आले असल्याचा दाखला त्यांनी दिला. फुले दांपत्यासोबतच भारतरत्न सर विश्वेश्वरैया, जे आर डी टाटा, सॉक्रेटीस,डॉक्टर श्रॉफ आदी मान्यवरांचे पुतळे बसवलेले असल्याचे सांगीतले. तर एम एस गोसावी यांचे तैलचित्र बसवण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामूळे आम्ही कुठल्या समाजाविरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडे यांच्या प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. ते जर मनोहर कुलकर्णी आहे, तर संभाजी नाव घेण्याची आवश्यकता का भासली ? असा सवाल उपस्थित करत हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं, हे योग्य नाही.’ते काय प्रसार करतात, हे तुम्हाला माहीत आहे. महापुरुषांबद्दल वाईट बोलण आणि अंधश्रद्धा या विचारांना आम्ही विरोध करणार असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जे कोणी लोकं संभाजी भिडे यांची बाजू घेतात, त्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते एवढ्या निर्भिडपणे महात्मा गांधी, फुले यांच्याबद्दल बोलतात, अगोदर त्यांनी स्वतःचे नाव स्पष्ट करावे अशी टीका त्यांनी यावेळी भिडेंवर केली.

कांदा अनुदानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी चर्चा झाली असून पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या द्वारे निधी मंजुर झाला असुन हळूहळू सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच. निर्यात शुल्क,निर्यात बंदी यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा यांच्याशी बोलून केंद्रात काही चर्चा करता येते का याचा प्रयत्न करेल असे त्यांनी स्पष्ट केले.