“कोण दीपाली सय्यद, कोण विचारतंय तिला”, एकेरी उल्लेख करत मनसे नेत्याने उडवली खिल्ली

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने (MNS) महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरून अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी, असा खोचक सल्ला दिला.

ट्वीट करत दीपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत. हे दोन दिवसांचं काम आहे. उगाच तुरुंगामध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा.”

दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याची मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी खिल्ली उडवली आहे. दीपाली सय्यद यांच्याबाबत प्रश्न विचारताच संदीप देशपांडे म्हणाले, “आहो… सोडा ओ… कोण दीपाली सय्यद? कोण विचारतंय तिला? त्या नेमक्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ते आधी सांगा. आपण कुणाला महत्त्व द्यायलं हवं, याचाही विचार केला पाहिजे.” प्रसारमाध्यमांना ‘जागर यात्रे’बाबत माहिती देताना संदीप देशपांडे यांनी ही टीका केली.