रशियाचे ‘लुना’ कोसळले; जाणून घ्या आपले चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या कधी उतरणार

Chandrayaan : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेतील यान बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास उतरणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या संकेतस्थळ, अधिकृत यूट्यूब वाहिनी आणि फेसबुक पेज आणि डीडी नॅशनल या वाहिनीवरून केलं जाणार आहे.

लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ यांचा समावेश असलेल्या चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला गती कमी करण्यात आणि कक्षा लहान करण्यात यश आलं आहे. हे यान आता चंद्रापासून जास्तीत जास्त 134 तर कमीत कमी 25 किलोमीटर अंतरावर आहे. या मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरेल. अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत संघ आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश असेल.

रशिया-ल्युना-25

रशियाची चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे. ल्युना 25 हे रशियाचं चांद्रयान काल नियंत्रणाबाहेर गेलं आणि चंद्रावर कोसळलं. रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉस नं ही माहिती दिली आहे. प्रोपल्शन मोड्यूलची प्रत्यक्षातली आणि मोजलेली परिमाणं यात फरक आल्यामुळे हे यान अपेक्षित नसलेल्या कक्षेत गेलं आणि त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं असं रॉसकॉसमॉस नं म्हटलं आहे. काल हे यान चंद्रावर उतरणं अपेक्षित होतं. मात्र मॉस्कोच्या प्रमाणवेळेनुसार 2 वाजून 57 मिनिटांनी यानाचा संपर्क तुटला. त्यानंतर यानाचा शोध घेऊन परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो निष्फळ ठरला.