‘संभाजी ब्रिगेड आणि आम्ही महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत’

मुंबई – शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. याच मुद्द्यावरून आज सामनातून शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा! असं यात म्हटलं आहे.

शिवसेनेप्रमाणेच संभाजी ब्रिगेडही महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताची संघटना आहे. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या सामाजिक, राजकीय, लोककल्याणकारी आणि महाराष्ट्र धर्माशी इमान राखणाऱ्या संभाजी ब्रिगेडने कठीण काळात शिवसेनेस प्रेमाचे आलिंगन द्यावे यापेक्षा मोठा राजधर्म कोणता असेल? महाराष्ट्र हित रक्षणासाठी, राज्याच्या स्वाभिमान रक्षणासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठय़ा परिवर्तनाची चाहुल आहे. आज शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी खुपसले आहेत. छत्रपती संभाजीराजांचे औरंगजेबाने हालहाल केले. कारण राजे धर्मरक्षक होते. दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवरायांना दिल्लीत बोलावून अपमानित केले व नंतर बंदी बनवले. कारण छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे कार्य हाती घेऊन दिग्विजयाच्या दिशेने झेपावले होते.

शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी शिवराय-संभाजीराजेप्रेमी संघटनादेखील दिल्लीतील बादशाहीच्या डोळय़ात खुपू लागली आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर खुपसून महाराष्ट्राच्या भूमीत बेइमानी व दुहीचे बीज त्यांनी फेकले. या कठीण समयी संभाजी ब्रिगेडसारखी जहाल, सळसळत्या रक्ताची संघटना भावाच्या मायेने पाठीशी उभी राहिली याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. सर्वत्र गद्दारीचा मुसळधार सुकाळ सुरू आहे. इमानाचे शेपूट आत घालून जो तो आपल्या बेइमानीचे सर्टिफिकेट दाखवण्यासाठी पुढाकार घेत असताना गेल्या पंचविसेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या गावखेडय़ात काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा हात पकडला आहे हे शुभ लक्षण आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी स्पष्टच सांगितले, आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत, ते सत्यच आहे. संभाजी ब्रिगेडशी संवाद आणि युती ही फक्त सुरुवात आहे असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.