बिपीन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तान लष्कराने जे म्हटलंय ते वाचून…

नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे डायरेक्‍टिंग स्टाफ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगभरातील बड्या हस्तींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी लष्कराने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतरांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘जनरल नदीम रजा, जनरल कमर जावेद बाजवा आणि सीओएएस (चीफ ऑफ द आर्मी स्टाफ) हे सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतरांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे.’ असं ट्विट पाकिस्तानी लष्कराने केले आहे.