स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज ‘भगवा’ करण्यासाठी संभाजी भिडेंची रॅली, पुन्हा नव्या वादाची ठिणगी..!

सांगली- आज संपूर्ण भारतात ७७वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. एकीकडे भारतवासी तिरंग्याच्या उत्सवात रंगलेले असताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या भगवा रॅलीमुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारताचा राष्ट्रध्वज भगवा करण्याच्या मागणीसाठी संभाजी भिडे यांनी मंगळवारी सांगलीत आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा काढली. ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजही भगवा असावा,’ असा त्यांचा युक्तिवाद आहे. भिडे यांच्या धारकऱ्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, भगव्या ध्वजाला हार प्रदान करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा सुरू झाली. शिवाजी मंडई, मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ मार्गे राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या पदयात्रेची सांगता झाली. संभाजी भिडे हे रॅलीच्या शेवटी एकटेच चालत सहभागी झाल्याचे दिसून आले.