पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था; डॉ. लागूंसोबत काम केलेला मराठी अभिनेता दुर्धर आजाराने ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील (Rajan Patil) यांना दुर्धर आजार झाला आहे. डॉ. लागू, मधुकर तोरडमल अशा दिग्गजांसोबत काम करणारे राजन पाटील यांनी स्वत: आपल्या आजाराबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

राजन पाटील यांचा नुकताच १३ ऑगस्टला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने फेसबुक पोस्ट करत राजन पाटील म्हणाले, टाइम्स मधील नोकरी गेल्यानंतर मी माझ्या आवडत्या अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. सुदैवाने लोकांनी मला अभिनेता म्हणून स्वीकारले. डॉ. लागू, प्रा. मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, अशा मोठ्या रंगकर्मी बरोबर काम करून त्यांची शाबासकी मिळवली. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, ज्याचं मोल नाही करता येणार. या व्यवसायाने मला प्रसिद्धी मिळाली. मराठी दूरदर्शन मालिकांमुळे मी लोकांच्या घराघरात पोहचलो. स्टार नाही झालो पण सुजाण, संवेदनशील अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. आणखी काय हवं !

आयुष्याच्या या प्रवासात माझ्या प्रकृतीवर खूप आघात झाले. गूढ ( ज्याचं कारण किंवा नाव मला अद्यापही माहीत नाही ) आजार,पोलिओ, टायफॉइड,कॅन्सर, अनेक रस्ता अपघातांमुळे झालेली हाडांची मोडतोड अशा अनेक आजारांशी लढलो आणि त्यांना पिटाळून लावले. आतापर्यंत माझी अकरा ऑपरेशन्स झाली आहेत. म्हणजे गंमत बघा मी फक्त नाटकाच्या थिएटरवर प्रेम केलं असं नाही तर तितकेच प्रेम ऑपरेशन थिएटर वर सुद्धा केले. आता गेली दहा वर्षे मी पार्किन्सन्स या आजाराशी लढतोय. लढाई कठीण आहे. पण लढणे हा माझा हक्क आहे, माझा स्वभाव आहे. या लढाईत तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे. त्या तुमच्याकडून मिळतील याची मला खात्री आहे. गेली तीन वर्षं माझ्या अभिनयाच्या क्षेत्रापासून मी दूर आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था झालीय. पुन्हा कार्यरत होण्याची जबरदस्त इच्छा आहे. बघुया …, अशा शब्दांत राजन पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.