‘उद्धव ठाकरे यांनीही मला सकाळी फोन केला होता, जे घडलं ते पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली’

पुणे –  शिवसेनेतून (shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींवर आता स्वतः आढळराव पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे. कोणीही सांगावं मी कोणती पक्ष विरोधी कारवाई केली. माझी झालेली हकालपट्टी ऐकून मी खूप दुःखी झालो असल्याचे वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं.

आता हकालपट्टी केली नाही, असं पत्र पाठवलं आहे. पण काय फायदा झाला त्याचा. यातून माझी राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? 20 वर्ष निष्टेनं काम केली त्याचं हे फळ मिळालं. पक्षात आज माझी काय किंमत आहे हे मला समजलं असेही आढळराव पाटील म्हणाले.   अनेकांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मग माझ्या एकट्यावर हकालपट्टीची कारवाई का? असा सवालही आढळराव पाटील यांनी केला. आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवरील बातम्या पाहिल्या त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मला धक्का बसला असेही शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मला सकाळी फोन केला होता. जे घडलं ते पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली. पण या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवं तर उद्धव ठाकरेंना देखील भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवूयात असेही आढळराव पाटील म्हणाले.