‘राष्ट्रवादीनेच मराठा-ब्राह्मण, मराठा-ओबीसी या जातीजातींमध्ये  भांडणं लावली’ 

मुंबई   – महाराष्ट्र (Maharashtra) पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra aavhad)  यांनी काल केली. माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली. महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय… त्यांच्या खिशात पैसे नाहीयत… गॅस महाग झालाय… पेट्रोल – डिझेल महागलंय… भाज्या… केरोसिन महाग झालंय… खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

दरम्यान, आव्हाड यांच्या या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड यांना मला एकच सांगायचं आहे की 1999 मध्ये त्यांचा पक्ष स्थापन झाला. पक्ष स्थापन झाल्यापासून मराठा-ब्राह्मण मराठा-ओबीसी या जातीजातींमध्ये ज्यांनी भांडण लावली त्यांनी आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. महाराष्ट्राची काळजी सगळ्यात जास्त राज ठाकरे यांना आहे आणि आव्हाडांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अक्कल आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये.

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)  पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना माझं निवेदन आहे, मला हेच सांगायचं की आम्हाला अक्कल शिकवण्याआधी आधी तुम्ही किती आणि कुठे भांडणं लावली याचा तुम्ही विचार करावा. राज ठाकरेंना महाराष्ट्राची काळजी आहे, त्यामुळे कुठली गोष्ट कशापद्धतीने बोलायची, हाताळायची हे आम्हाला माहित आहे. जर कायद्यात 50 डेसिबलच्या वर आवाज नको, तर त्याचं पालन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, त्यांनी ते पाळावं.