भारतीय पठ्ठ्या अमेरिकेत उंचावतोय देशाची मान, युनिकॉर्न्सविरुद्ध फक्त ९ धावा देत घेतल्या ६ विकेट

Saurabh Netravalkar : सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट (Major League Cricket) खेळले जात आहे. भारतीय वंशाचा सौरभ नेत्रावलकर लीगमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमकडून खेळत आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सौरभने आपल्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली. या सामन्यात सौरभने 9 धावा देऊन 6 बळी घेतले.

सौरभ नेत्रावलकरने भारताकडून 2010 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळला होता. सौरभ केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि जयदेव उनाडकट यांसारख्या अनेक भारतीय स्टार्ससोबत खेळला आहे. आता तो अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याचबरोबर अमेरिकेत सुरू असलेल्या लीगमध्येही त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले.

मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉइनिस, शादाब खान, चैतन्य बिश्नोई, हॅरिस रौफ आणि लियाम प्लंकेटसारख्या स्टार खेळाडूंना सौरभने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सविरुद्ध पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सौरभच्या गोलंदाजीसमोर सॅन फ्रान्सिस्कोचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्याने कमी धावसंख्येच्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. या चमकदार कामगिरीसाठी सौरभला ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.

सॅन फ्रान्सिस्को संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वॉशिंग्टनचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 133 धावाच करू शकला. संघासाठी मॉइसेस हेन्रिक्सने 3 चौकारांच्या मदतीने 30 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. धावांचा पाठलाग करताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा संघ 19.5 षटकांत अवघ्या 103 धावांत सर्वबाद झाला.

संघाकडून कोरी अँडरसनने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 34 धावा केल्या. याशिवाय जवळपास सर्वच फलंदाज अपयशी दिसले. संघातील एकूण 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. सौरभ नेत्रावलकरशिवाय मार्को जॅनसेन, एनरिक नोर्किया, अकिल होसेन आणि डॅन पीट यांनी 1-1 बळी घेतला.