पुणे जिल्ह्यातील ‘या’ राष्ट्रवादीच्या आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागणार ?

पुणे : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली असून आता खांदेपालट तसेच विस्तार  होण्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरुन शिवसेना (shivsena) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. निधीवाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार उघडपणे जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. यामुळेच आता मंत्रिमंडळ विस्तारातून काहीप्रमाणात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता काही तरुण आमदारांची मंत्रीपदी देखील वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. यात आमदार सुनील शेळके (sunil shelake)  यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. शेळके हे त्यांच्या कामाच्या धडक्यासाठी ओळखले जातात. सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत तळमळीने त्यांनी अधिवेशनात मांडले होते. याशिवाय त्यांची लोकप्रियता देखील बरी असल्याने त्यांच्या गळ्यात माल पडू शकेल असं जाणकारांचे म्हणणे आहे.

शेळके यांनी 90 हजारांपेक्षा अधिक मतांनी मताधिक्‍य घेत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा आता दारून पराभवकेला होता. शेवटपर्यंत चुरशीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एकतर्फीच ठरली. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या असल्या तरीही  ते पहिल्यांदाच निवडून आले असल्याने त्यांच्या नावाचा पक्ष किती विचार करणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला भाजपकडून (BJP) खिंडीत पकडले जात असताना काही जुन्या जाणत्या नेत्यांना देखील मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते असे समजते. तर काही निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देखील दिला जाऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.