मविआ-एआयएम एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न :  फडणवीस

मुंबई  – गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. भाजपाला दूर ठेवणं आणि देशातून भाजप नष्ट करणं, या समान उद्दिष्टासाठी हा प्रस्ताव असल्याचं खासदारांनी सांगितलं.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्याकरता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेला टोले लगावले आहेत.’मविआ-एआयएम (Maha Vikas Aghadi aimim)एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत पण जनता भाजपच्या पाठिशी आहे. लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. हे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.