राज्यात इतरही अनेक समस्या आहेत मात्र सरकारला केवळ मद्यविक्रितीच रस – नवनीत राणा

देगलूर – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावरुन अनेकांनी सरकारला ट्रोल केलंय. मात्र, सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत.

दरम्यान दुसरीकडे शासनाच्या नव्या वाईन पॉलिसीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ मद्यविक्रीत रस असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. राज्यात इतरही अनेक विषय आहेत समस्या आहेत मात्र तरी देखील सरकार किराणा दुकांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देत असल्याचा टोला यावेळी राणा यांनी लगावला आहे.