आयपीएलच्या आयोजनावरून सेना – मनसेत जुंपली; देशपांडेनी आदित्य ठाकरेंना विचारला जाब 

 मुंबई – परप्रांतीयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने एल्गार केला आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. दक्षिण मुंबईतील चर्चगेट भागात असलेल्या ताज हॉटेल बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी या बस फोडल्या.

बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांच्यात जुंपली आहे. देशपांडेंनी टि्वट करीत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आयपीएल संदर्भातील स्थानिकांना काम मिळणार नसतील तर स्पर्धा मुंबईत भरवण्याचा खटाटोप का केला जातोय, असा प्रश्न देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. महाराष्ट्रामध्ये ipl चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?? असे त्यांनी म्हटलं आहे.