काश्मिरी पंडितांच्या डोक्यात किंवा हृदयात गोळ्या घालून मी हत्या करायचो; बिट्टाच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली-  बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला  ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत बिट्टाने 20 पेक्षा अधिक काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची कबुली दिली होती.

या मुलाखतीत बिट्टा म्हणतो की, त्याला त्याच्या आई किंवा भावाला मारण्याचा आदेश आला तरी तो त्यांनाही मारायला मागेपुढे पाहणार नाही. बिट्टाने 22 वर्षीय काश्मिरी पंडित सतीश कुमार टिक्कू यांच्या हत्येनंतर खोऱ्यात हत्याकांडांची मालिका कशी सुरू केली याचे वर्णन केले आहे. बिट्टाचा पहिला बळी सतीश कुमार टिक्कू होता असं तो सांगत आहे.

यावर मुलाखतकार त्याला सतीशला का मारलं? असा सवाल करतो. या प्रश्नाचे उत्तर देताना बिट्टा म्हणाला की कदाचित ते आरएसएसचे  होते म्हणून मारलं. काश्मिरी पंडितांच्या डोक्यात किंवा हृदयात गोळ्या झाडल्याचा दावा बिट्टाने केला आहे. त्याचे लक्ष्य कधीच चुकले नाही असेही तो म्हणतो.