आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

नवी दिल्ली- बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हा सिनेमा महाराष्ट्र राज्यात करमुक्त करावा अशी देखील मागणी जोर धरत आहे. मात्र जनभावनेचा विचार न करता ठाकरे सरकार काही केल्या हा चित्रपट करमुक्त करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला असून बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेंच्या सरकारचं वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. मी स्वत: वयाच्या १८व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितलं आहे. असं देशातलं सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो.

दरम्यान, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आता त्यांना काश्मीर आठवले आहे. मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये. आम्ही ठाकरे चित्रपट बनवला. मात्र, तो सुद्धा टॅक्स फ्री केला नाही.