राज्यपालांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘या’ आमदाराने केले चक्क शीर्षासन

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आज पडसाद पाहायला मिळाले. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपावांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

दरम्यान, राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडलं आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. आमदार संजय दौंड यांनी तर शीर्षासन अर्थात खाली डोकं, वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला. दरम्यान, या निषेध करण्याच्या अनोख्या पद्धतीची सध्या बरची चर्चा होताना दिसत आहे.