राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर – राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल, त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात केली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी ते जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच आजही महत्त्वाचे आहेत आणि आणखी हजारो वर्षांनंतरही ते तेवढेच महत्त्वाचे असतील असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

प्राणांपेक्षा देशसेवा महत्त्वाची मानणाऱ्या राजपूत समाजाचे देशाच्या इतिहासात मोठे योगदान आहे. या समाजाला कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्यांसाठी येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

https://youtu.be/nnDThEISWHk