हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे; नामांतराला स्थगिती दिल्यानंतर राऊत संतापले

Mumbai – महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणांची आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याच्या मागील उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने तूर्त स्थगिती दिली आहे. शिंदे फडणवीस सरकार हा प्रस्ताव नव्याने मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे.

ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला, त्या वेळी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.यामुळेच या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

दरम्यान, यावरून आता शिंदे सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दी बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते.याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत असं ते म्हणाले.हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्यायचाय. एवढंच मी सांगतोय , असं राऊत म्हणाले.