“अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…”, ‘त्या’ विधानावरून राऊतांचा टोला

Sanjay Raut :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या EVM वरील विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे. अजित पवार यांचा ईव्हीएमवर विश्वास असेल. मात्र, देशाचा विश्वास नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता संजय राऊत यांनीही या विधानावर टीकास्त्र सोडले आहे.

अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.