‘मी शेतकरी कुटुंबातून आलोय, माझा प्रत्येक षटकार माझ्यासाठी झटणाऱ्या…’, रिंकू सिंगने जिंकली लाखो मने

अहमदाबाद| कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKRvsGT) संघात झालेला आयपीएल २०२३ मधील १३वा सामना अतिशय थरारक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ बाद २०४ धावा केल्या होत्या. गुजरातच्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने शेवटच्या षटकात महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकत समस्त क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधले.

कोलकात्याला संस्मरणीय विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या पाच चेंडूंमध्ये पाच षटकार (Rinku Singh 5 Sixes) मारणाऱ्या रिंकू सिंगने आपला प्रत्येक षटकार त्याच्यासाठी लढवैय्या कुटुंबाला समर्पित केला. रिंकू उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील सामान्य कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवायचे. रिंकूने गुजरातविरुद्ध २१ चेंडूत ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या.

गुजरातविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळल्यानंतर रिंकू म्हणाला, ‘मी हे करू शकेन याची मला खात्री होती. गेल्या वर्षी लखनऊमध्ये मी अशाच परिस्थितीत शानदार आणि निर्भीड फलंदाजी केली होती. तोच विश्वास अजूनही माझ्यात होता. मी फलंदाजी करताना जास्त विचार करत नव्हतो, फक्त एकामागून एक शॉट्स मारत होतो.’

‘माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला आहे, मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, मी मैदानाबाहेर मारलेला प्रत्येक चेंडू त्या लोकांना समर्पित होता ज्यांनी माझ्यासाठी खूप बलिदान दिले,’ असे म्हणत रिंकूने पुन्हा एकदा क्रिकेटचाहत्यांची मने जिंकली आहेत.