‘पाच कोटींचे काम फ्रीमध्ये करून देणाऱ्या ‘त्या’ डेकोरेटर्सचे नाव आणि नंबर संजय राऊत यांनी जाहीर करावे’

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा आरोप केला. आपल्या मुलीच्या लग्नाच्या डेकोरेशनसाठी आलेल्या फूलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली.

मुलीच्या लग्नात घडलेल्या या प्रसंगावर बोलताना राऊतांनी फूलवाल्यासोबत घडलेल्या प्रसंगावरुन ईडीवर थेट हल्लाबोल केला. फूलवाल्याला जेव्हा पैशांबाबत विचारणा करण्यात आलेली तेव्हा त्यानं कोणतेही पैसे न घेतल्याचं म्हटलंय. राऊतांची मुलगी ही माझ्या घरातल्याप्रमाणेच आहेत. तिला मी लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. तिच्या लग्नात मी पैसे कसे काय घेऊ, असं म्हटल्यानंतर गन पॉईन्टवर त्याला ईडीच्या लोकांनी धमकावलं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या आरोपांची भाजपनेते मोहित कंबोज यांनी खिल्ली उडवली आहे ते आपल्या ट्वीट मध्ये म्हणाले, संजय राऊत साहेब तुम्ही त्या डेकोरेटर्सचे नाव आणि मोबाईल नंबर जाहीर करा जो डेकोरेशनचे काम पाच कोटींचे काम फ्रीमध्ये करून देतो.