‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’

म्हापसा : म्हापसा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल गंगानगर-खोर्ली येथे कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे .

नेमकं काय आहे प्रकरण ?

कांदोळकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात येत असून प्रचार आठ वाजता संपतो मग साडे अकरा वाजता कांदोळकर हे त्याठिकाणी काय करत होते असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच नोंदणीकृत वाहनाचा वापर न करता दुसऱ्याच वाहनाचा वापर ते का करत होते याचे देखील उत्तर आता कांदोळकर यांना द्यावे लागणार आहे. याशिवाय काल त्यांच्या वाहनात निवडणूक प्रचाराचे साहित्य देखील सापडले असल्याचे देखील समोर आल्याने याच अनुशंघाने कलम १८८ अंतर्गत आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना घडत असलेल्या ठिकाणी काल निवडणूक आयोगाची टीम त्याठिकाणी दाखल झाली होती. पुढे निवडणुक आयोगाने पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस कांदोळकर यांना गाडीतून पोलीस स्टेशनला घेवून गेले. रात्री ३ वाजेपर्यंत कांदोळकर हे त्याठिकाणी होते असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कांदोळकर यांची ती गाडी देखील पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे टीकास्त्र

दरम्यान, हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते रोहन कवळेकर यांनी कांदोळकर यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकर यांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत. जो उमेदवार निवडून येण्याआधीच काळे धंदे करत असेल तो निवडून आल्यावर किती भ्रष्ट कारभार करेल याचा मायबाप मतदारांनीच विचार करावा. कॉंग्रेसचे मायकल लोबो यांच्यासह अनेक दिग्गजनेते युवा आमदार जोशुआ डिसुझा यांच्याविरोधात मैदानात उतरवून देखील फारसा फरक दिसत नसल्याने कांदोळकर यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे अशी टीका भाजप नेते रोहन कवळेकर यांनी केली आहे.