वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

India vs Australia Final World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head coach Rahul Dravid) यांचा करार संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच द्रविडबाबत निर्णय घेऊ शकते. २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, फायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन बनला. भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक लोक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर टीका करत आहेत.

द्रविडने 2021 मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा करार T20 विश्वचषक 2021 मधील गट स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर संपला. बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ आणखी वाढवला नाही. यानंतर द्रविडला दोन वर्षांसाठी जबाबदारी देण्यात आली. पण आता द्रविडचा करार २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर संपला आहे. टीम इंडिया चॅम्पियन झाली असती तर द्रविडला पुन्हा प्रशिक्षक बनवण्याची मागणी होऊ शकली असती. पण आता काय होणार, याचा निर्णय बीसीसीआय लवकरच घेईल.

भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण असेल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयने 2019 मध्ये रवी शास्त्रीचा करार वाढवला होता. शास्त्री सलग दोन वेळा प्रशिक्षक होते. पण द्रविडच्या बाबतीत असे घडण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

महत्वाच्या बातम्या-