तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच होणार – संजय राऊत

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत.

यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं नुकतेच ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच होणार आहे. काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य नाही. काँग्रेसला सोबत घेऊन आपण काम केले तर त्याचा चांगला फायदा होईल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही आधीच सांगितले आहे की, अनेक पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या युपीएलाच आणखी मजबूत बनवले पाहिजे. काँग्रेससोबत अनेकांचे मतभेद असू शकतात. महाराष्ट्रातसुद्धा आमचे मतभेद आहेतच परंतु, आम्ही एकमेकांना साथ देऊन सत्ता चालवत आहोत.असे संजय राऊत यांनी सांगितले.