आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट बंधनकारक – नितीन गडकरी

नवी दिल्ली – कारच्या मागील आसनांवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. त्याचवेळी, वाहनांमधील मागील आसनांच्या ‘सीट बेल्ट’साठीही (seat belt) अलार्म बसवणे मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती त्यांनी मंगळवारी दिली.

गडकरी म्हणाले, ‘मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट लावणे हे आधीपासूनच अनिवार्य आहे. परंतु, लोक त्याचे पालन करीत नाहीत. मागच्या सीटवरील प्रवाशांनी पुढच्या सीटप्रमाणे बेल्ट न लावल्यास अलार्म वाजेल. त्यानंतरही त्यांनी बेल्ट लावला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.

सध्या मोटारचालक व त्याच्या बाजूच्या आसनावरील व्यक्तीने सीट बेल्ट लावलेला नसल्यास अलार्म वाजतो. पुढील दोन आसनांबाबत हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे सध्या मोटारनिर्मिती कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र, आता मागील आसनांसाठीही ही सुविधा पुरवणे बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.