भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; लोबो यांच्या विरोधात ‘हा’ नेता उतरणार मैदानात

पणजी – काही दिवसांपूर्वी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये 40 मतदारसंघांपैकी 34 मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. 34 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उरलेल्या 6 जागांसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज भाजपतर्फे (BJP) दुसरी उमेदवार यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे.

या यादीनुसार राजेश पाटणेकर (डिचोली),जोसेफ सिक्वेरा (कळंगुट),अंतानियो फर्नांडिस (सांताक्रुझ), जेनिता पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे), नारायण नाईक (कुठ्ठाळी) अँथनी बारबोसा (कुडतरी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप पहिल्यांदाच 40 पैकी 40 जागांवर ही विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमके कोणते वळण घेणार याची संगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपला कळंगुटमध्ये मजबूत उमेदवार मिळालेला आहे. सिक्वेरा हे कळंगुट पंचायतीचे अनेक वर्षे सरपंच होते. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग व मतदार आहेत . त्यामुळे कळंगुट सर करण्यास सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपच्या हाती एक मजबूत मोहरा लागला आहे . या यादीत एकूण 6 जणांचा समावेश आहे.

जोसेफ सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिल्याने आता कॉंग्रेस नेते मायकल लोबो यांना त्यांच्याच मतदार संघातून निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जोसेफ सिक्वेरा यांनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे लोबो यांना कळंगुटमध्येच अडकवून ठेवण्यात भाजप यशस्वी झाली आहे.