बीएमसीमध्ये आमची सत्ता आल्यास आम्ही ‘त्या’ मैदानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवू – भातखळकर

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे नामकरण कसे करू दिले, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व बोगस आहे. आम्ही भाजपच्या इतर नेत्यांसोबत धरणे आंदोलन करून विरोध करू. आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही वचन देतो की बीएमसीमध्ये आमची सत्ता आल्यास आम्ही या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवू.

भाजप आमदाराने पुढे आरोप केला की अस्लम शेख हीच व्यक्ती आहे ज्याने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या समर्थनार्थ पत्र लिहिले होते.शिवसेनेचा नवा चेहरा मुंबईकरांना आता चांगलाच ठाऊक आहे . केवळ सत्तेत राहण्यासाठी ते असे करत आहेत.