‘त्या’ मैदानाला एपीजे अब्दुल कलामांचं नाव द्या, पण टिपू सुलतानचं नको’

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून संघर्षाला सुरुवात झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे केले आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे नामकरण कसे करू दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, टिपू सुलतान या नावावरून बजरंग दल (Bajrang Dal)चांगलेच आक्रमक झाले आहे. मालाडमधील ज्या क्रिडा संकुलाच्या नावावरून हा वाद पेटला आहे, त्या क्रिडा संकुलाच्या बाहेर बजरंग दलाने जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी बजरंग दलाकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांना आवर घालण्यासाठी यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.अस्लम शेख जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलाला देत आहेत, असं आंदोलक म्हणाले. जेव्हा पर्यंत या संकुलाचं नाव बदललं जात नाही, तोपर्यंत या संकुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.