अमित शहा यांना गृह मंत्रालयाऐवजी क्रीडा मंत्रालयात पाठवा; भाजप नेत्याची मागणी

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या (Target killing) माध्यमातून बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे.

काश्मीरमधील एका कुटुंबाचे अश्रू सुकण्यापूर्वीच आणखी एका हल्ल्याची बातमी येते. दहशतवादी उघडपणे लोकांना मारून दहशत पसरवत आहेत, पण केंद्रातील सरकारला याची कोणतीही चिंता नसल्याचे दिसत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आणखी किती निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतील? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

१९९० च्या दशकात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. भाजपने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याबद्दल वाचन दिले होते आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. मात्र आता जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.असचं दिसून येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमध्ये हिंदूंच्या मृत्यूवरून भाजप नेतेही सरकारवर चिडताना दिसत आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा यांना गृह मंत्रालयाऐवजी क्रीडा मंत्रालयात पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये रोज काश्मिरी पंडितांची हत्या होत आहे, आता अमित शाह यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

स्वामी यांनी ट्विट केले की,जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही दररोज एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने, अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. त्याऐवजी त्याला क्रीडा मंत्रालय दिले जाऊ शकते कारण आजकाल क्रिकेटमध्ये अवाजवी रस आहे.असं ते म्हणाले.