महाविकास आघाडीला अजिबात धोका नाही, भाजपचेच आमदार फुटतील – सतेज पाटील 

कोल्हापूर –  राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार बनली आहे.(rajya-sabha-elections) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली असून शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. आज सकाळी मविआचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,  महाविकास आघाडीची एकत्र ताकद या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने राज्यसभेची निवडणूक लादलेली आहे. गेल्या वीस वर्षात ही निवडणूक बिनविरोध होत होत्या. यंदाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आघाडीने प्रयत्न केला पण त्याला यात यश आले नाही.पण आमचा विजय नक्की होईल,असं  गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले.

या निवडणुकीत घोडेबाजार होईल का, या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला अजिबात धोका नाही, कारण भाजपमधील किमान तीस आमदार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होते. भाजपचे आमदार फुटतील. त्यामुळे भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे, असे सतेज पाटील म्हणाले.