शिंदे-ठाकरे एकत्र येण्याबाबत दावा करणाऱ्या दीपाली सय्यद यांना संजय राऊतांनी सुनावलं 

मुंबई – राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून (Shivsena) बंड करत 50 आमदारांना (MLA)सोबत घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde- Uddhav Thackeray)चर्चेसाठी एकत्र येणार असल्याचं ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे (Tweet)राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र यावे याकरीता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्ती केल्याचे दिपाली सय्यद (Deepali sayed) यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपा नेत्यांचेही आभार मानले आहे.

दरम्यान,  संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एबीपी (APB Maza)माझाशी बोलताना म्हटलं आहे की, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.