सेन्सेक्स निफ्टीचा विक्रम : दोन्ही निर्देशांक नवीन उच्चांकावर बंद 

Stock Market : बुधवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) ऐतिहासिक ठरले आहे. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक आजच्या व्यवहाराच्या शेवटी नवीन ऐतिहासिक पातळीवर बंद झाले आहेत. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, बीएसई सेन्सेक्स 64,000 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच 19,000 चा टप्पा पार केला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 500 अंकांच्या उसळीसह 63,915 वर बंद झाला आणि निफ्टी 50 155 अंकांच्या उसळीसह 18,972 अंकांवर बंद झाला. बकरीदच्या सुट्टीमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील समभाग तेजीसह बंद झाले. तर मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये घट झाली आहे.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात मोठी तेजी दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप 224 किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 35,520 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 समभाग वाढीसह बंद झाले तर 6 समभाग तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 42 समभाग वधारले आणि 8 घसरले.

शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी झेप घेतली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसईचे मार्केट कॅप 294.13 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, तर मंगळवारी ते 292.11 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते.