दिवस फिरले : आदित्य ठाकरेंचा अत्यंत ‘खास माणूस’ शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल (Rahul Kanal) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत गुंतलेले असतानाच, त्याच दिवशी त्यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार”, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांच्या प्रश्नावर दिली आहे. तर दुसरीकडे राहुल कनाल यांनी याबाबतच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राहुल कनाल यांच्याबाबतच्या प्रश्नांना चांगलंच उधाण आलं आहे.