आमदारांना घर देण्याच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध; ठाकरे सरकारला घरचा आहेर

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे ते म्हणाले. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

या साऱ्या प्रकरणावरून सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.  यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शरद पवार यांनी या प्रकारे आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही, हा निर्णय चुकीचा असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला आहे. यामुळे सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री तोंडघशी पडताना सध्या दिसत आहे.  ‘साम टीव्ही’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. शरद पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांना साठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे दिली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय. या निर्णयाबाबत शरद पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्वत:चं सांगितलं आहे.

दरम्यान, आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सरकारवर टीका होऊ लागली आहे. आमदारांची कोट्यवधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.