महाविकास आघाडीत खदखद? ठाकरे- पवारांची तब्बल सव्वा तास चर्चा

Sharad Pawar Uddhav Thackeray meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांचे निवास स्थान ‘सिल्वर ओक’मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढूया या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशीची घेतलेली भूमिका, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी घेतलेली भूमिका, याबाबत तिन्ही पक्षात समन्वय साधला गेला नसल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले होते. आता पुढे असं होऊ नये यासाठी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.