चालत्या बसमध्ये एसटी ड्रायव्हरला हार्ट अटॅक, मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून 25 प्रवाशांना वाचवलं 

पुणे –  पुणे-सातारा हायवेवर एसटी बस सुसाट असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. याबाबत न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

बसला गती असतानाही त्याने कशीबशी बस बाजूला घेतली. चालकाने त्याच्यासोबत इतका मोठा प्रसंग घडला असतानाही प्रसंगावधान राखलं. बस थांबवल्यानंतर काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे.

जालिंदर पवार असं 45 वर्षीय चालकाचं नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली तसेच पुढे  हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.