‘शरदचंद्र पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ’

मुंबई  :- खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालत बोलतं विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त स्व.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पवार साहेबांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जयशंकर फेस्टिवल लॉन्स बँक्वेट हॉल, औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक येथे पार पडले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे,नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड,माजी आमदार जयवंतराव जाधव,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला शहराध्यक्ष समता परिषदेच्या शहराध्यक्ष कविता कर्डक,बाळासाहेब कर्डक,प्रेरणा बलकवडे,अनिता भामरे,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,ॲड.शिवाजी सहाणे,माजी नगरसेविका सुषमा पगारे, जगदीश पवार, योगिता आहेर, शैलेश ढगे, सचिन पिंगळे, सरचिटणीस संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, खा.शरदचंद्र पवार साहेबांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबियांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर नाही तर जगावर उपकार आहे. त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्यामाध्यमातून क्रांती झाली त्यामुळे आज जगाला शेती उत्पादने निर्यात करणारा भारत हा महत्वपूर्ण देश बनला आहे हे पवार साहेबांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. महिलांना सर्व क्षेत्रात समान आरक्षण मिळवून दिलं. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पवार साहेबांनी केवळ देशात नाही तर जगभरात महत्वाची माणसं जोडली आहे. त्यांना देशात संविधानावर काम करणार, राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीवर चालणारे, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे. त्यासाठी तुमचे आमचे कर्तव्य आहे त्यांना अभिप्रेत असलेले शासन देशात आणण्या कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की, मंत्रालयात सर्व महापुरुषांच्या सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतू त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांच्या विरोधात चुकीची टिपणी करत आहे हे योग्य नाही या वाचाळ वीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवरले पाहिजे आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.