दसरा मेळावा :  बिकेसी मैदानाची परवानगी असली तरीही शिंदे गट शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी आग्रही 

मुंबई  : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्या संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली.

कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान,  शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे आज उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असला तरीही या निर्णयामागील कारणे जाणून घेऊन त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू असल्याचे शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी स्पष्ट केले आहे. बिकेसी मैदानाची परवानगी असली तरीही आपण शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी आग्रही असून त्या दृष्टीने शिवसेना पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काहीही झालं तरिही हिंदुत्वाचा हुंकार आणि खरा विचार जाणून घेण्यासाठी भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.