कंसाची आणि रावणाची जिथे अशी आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही तिथे तुम क्या चिज हो शरद बाबू ?

मुंबई –   महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी काल सकाळी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी  सुमारे 2 तास शरद पवार यांनी या आमदारांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत आमदारांनीही आपल्या मनातील प्रश्न शरद पवार यांच्यासमोर ठेवले. बैठक आटोपल्यानंतर आमदार निघून जात असताना शरद पवार उभे राहिले, दोन्ही हात धरून मुठ घट्ट धरली आणि म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही.

भाजप त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी असेल, पण त्यांच्या अनेक नेत्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, हे मतही शरद पवार यांनी या तरुण आमदारांसमोर व्यक्त केले आहे. विशेषत: 24 तास काम करण्याची तयारी, योजनांचे मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती असे अनेक गुण भाजप नेत्यांकडून शिकायला हवेत. यासोबतच शरद पवार यांनी तरुण आमदारांना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा मंत्रही दिला.

दरम्यान, यानंतर आता भाजप नेत्यांकडून देखील पवारांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याच मुद्द्यावरून पवारांवर शरसंधान केले आहे. ते म्हणाले,  देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देता विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं यातूनच आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला हे शरद पवारांना चांगलंच समजलं आहे आणि म्हणूनच आपण केलेल्या चुकी पोटी आज देवेंद्रजी सातत्याने ठाकरे सरकारचे पुराव्यानिशी वस्त्रहरण करत आहेत त्यामुळे पुरत्या घाबरलेल्या खासदार शरद पवारांनी स्वतःला आणि नवख्या आमदारांना धीर देताना असं वक्तव्य केलं आहे की ‘घाबरू नका मी भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देत नाही !’ पण असं आहे कि कंसाची आणि रावणाची जिथे अशी आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही तिथे तुम क्या चिज हो शरद बाबू ? बुरा ना मानो होली है ! असं भोसले यांनी म्हटले आहे.