मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट भोवली, शिवसैनिकांनी दिला युवकाला चोप

जळगाव : सोशल मीडियावर (Social media post) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray)  यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणे युवकास भोवले आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकास शिवसैनिक (Shivsena) व महिला पदाधिकाऱ्यांनी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात चोप दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. ते चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवत चित्रपटगृहासमोर त्यांना बेदम मारहाण केली.

हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडून दिलं. दरम्यान, यावेळी द्वितीये यांच्यासोबत असणाऱ्या एका महिलेला देखील धक्काबुक्की झाली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सध्या जळगावसह राज्यात खळबळ माजली आहे.