शिवसेना की ‘लाचारसेना’? उद्यानाला हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव खपवून घेणार नाही – भाजपा

मुंबई – हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव मालाडमधील उद्यानाला देण्याचा घाट मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी अनधिकृतपणे घातला असून महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ‘वीर टिपू सुलतान उद्याने’ उभी राहतायत यावरून सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

उद्यान महाराष्ट्र शासनाचे, कार्यक्रम मुंबईच्या पालकमंत्र्यांचा? नामकरणाचा कुठलाही ठराव नाही? नामकरणाला कोणाचीही मान्यता नाही; मग हे नामकरण कसे होते आहे? ही मोगलाई आहे काय? हिंदूंची समूह कत्तल करणाऱ्यांचा उदोउदो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय? की, ते मतांच्या लाचारीसाठी चिडीचूप आहेत काय? असा सवाल करत जनाबसेनेचे हिंदूविरोधी कृत्य भारतीय जनता पक्ष कदापि खपवून घेणार नाही असा तीव्र इशारा स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिला.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाषणात बोलतात तर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातच हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आक्रमकांचे उदात्तीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्मांध प्रवृत्ती फोफावताना दिसत आहेत. स्थानिकांनी या नामकरणाला विरोध केला असतानाही आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेने मात्र, यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे अशी टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

उद्यान व्हावे पण नावाला आक्षेप
टिपू सुलतान हा धर्मांध क्रूरकर्मा अत्याचारी आणि दक्षिणेतील औरंगजेब म्हणून नावाजलेला कुशासक होता. शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय? त्यामुळे उद्यानास मौलाना आझाद, महामहिम अब्दुल कलाम, हवलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे द्यावीत अशी आग्रही भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे.

शिवसेनेचा छुपा पाठिंबा
यापूर्वी गोवंडी येथील महापालिकेच्या उद्यानास टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या सभेत प्रस्ताव आला असता शिवसेनेने या विषयाला बगल देत पळ काढला व प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचार्थ पाठवला होता. त्यावेळी भाजप नगरसेवकांनी प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याकरिता उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्यांना बोलू दिले नाही. त्यावेळी भाजपा सदस्यांनी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला होता. आता भाजपा रस्त्यावर उतरून ही लढाई लढेल असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला.