रोहित पवारांसह मराठवाड्यातील ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात

पुणे – राज्यासह देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलेब्रेटी, खेळाडू, तसेच राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, रोहित पवार प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत अशी माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

दुसऱ्या बाजूला लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशमुख यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असं ट्वीट धिरज देशमुख यांनी केलं आहे.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,आदिवासी मंत्री के. सी. पाडवी,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,खासदार सुप्रिया सुळे,आमदार सागर मेघे,आमदार राधाकृष्ण विखे पाटील,आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक,आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर),आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे .